ते वाहतुकीचे नियम पाळणार काय?
ते वाहतुकीचे नियम पाळणार काय?
ज्यांना अजूनही वाटतं की या देशावर ब्रिटिशांचं राज्य आहे. शासन म्हणजे आम्ही नव्हे. जे रस्त्यावर घोषणा देतात. बसेस जळतात. ज्यांना फक्त लोकशाहीचे लाभ हवेत. नागरिक म्हणून कोणतेच कर्तव्य पाळावयाचे नाही. ते वाहतुकीचे नियम पाळणार काय?
लोकसत्तेमध्ये अनेक अधिनियम आमचे प्रतिनिधी करतात. हे अधिनियम ज्यांना माहित सुद्धा करून घ्यावयाचे नाही. ज्यांना रस्त्यावर उतरून ‘माझ्यावर अन्याय होत आहे' एवढीच बोंब ठोकायची आहे. समस्येचे स्वरूप जाणून घ्यायचे नाही. समस्येची सोडवणूक करायची नाही. समस्या केवळ निर्माण करून ठेवायची आहे. ते वाहतुकीचे नियम पाळणार काय?
सगळ्या समजाला वेठीला धरून, मागण्या मान्य करून घेता येतात असं ज्यांना वाटतं. मोर्चे, रास्ता रोको, घेराव, ठिय्या आंदोलन, घोषणाबाजी, भाषणबाजी, सत्ताकारण, दबावतंत्र हेच मार्ग उपलब्ध आहेत असे ज्यांना वाटते. ते वाहतुकीचे नियम पाळणार काय?
शासकीय सेवा आणि त्या संदर्भातले लाभ हे लोकसत्तेने दिलेले आहेत. मुळात याला सेवा न म्हणतात ज्यांना ते केवळ लाभच वाटतात. उदरनिर्वाहाचे नव्हेत तर कमाईचे साधन वाटतात. हे लाभ लोकसत्तेत मान्य असलेले किमान मूलभूत नियम जसे सामान्य जनजीवन, शांतता, सुव्यवस्था या साऱ्यांचा बळी देऊनच मिळवणार असे ज्यांनी ठरवले आहे. ते वाहतुकीचे नियम पाळणार काय?
ज्यांना पुढेमागे अगदी स्वतःच्या निव्वळ गुणवत्तेवर सुद्धा खाजगी किंवा शासकीय सेवा करण्यास मिळणे सहज शक्य आहे अशा तरुण पिढीला राजकारणाकरिता ज्यांना वापरायचे आहे. तरुण पिढीवर अपराध नोंद व्हावेत, आत्मक्लेश तरुणांनी करून घ्यावेत असे सांगून ज्यांना तरुणांचे वर्तमान आणि भविष्य या दोन्हीचे वाटोळे करावयाचे आहे. ते वाहतुकीचे नियम पळणार काय?
सीमेवर देशाचे अहोरात्र रक्षण करणारे सैनिक हुतात्मा झाल्यावर त्यांच्या स्मारक निधीचा पैसा ज्यांना खायचा आहे. पण कुठे प्रवासात सैनिक दिसला तर त्याची अवहेलनाच करायची आहे. राष्ट्रगीताचा मान राखणं म्हणजे देशभक्ती आहे किंवा नाही, किंवा मान राखणे कंपल्सरी करावे किंवा नाही याबाबत ज्यांना फालतू चर्चा करून स्वतःचा निकृष्टपणा आणि अमानवी बुद्धीजैवित्व दाखवायचे आहे. ज्यांच्या बुद्धीला कोणताही मानवी चेहरा नाही, आहे ते केवळ एक निर्दयी अव्यवहारी विचारमंथन. ते वाहतुकीचे नियम पाळणार काय?
हे आमचे प्रहरी यांना मराठीत पदनाम कोशांमध्ये ‘पोलीस' असे म्हणतात. या प्रहरींचे तीन तीन दिवस रस्त्यावरच कर्तव्य बजावणे हे त्यांचे कामच आहे असे ज्यांना वाटते. ज्यांना वाटते की प्रहरी केवळ अपमान सहन करण्यासाठीच असतात. जे एखाद्या फालतू युवा नेत्यासाठी फोन करून प्रहरींवर दबाव आणून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू पाहतात. मी कोण आहे माहित नाही काय? बिन पाण्याचे ठिकाणी तुझी बदली करीन? तुला मस्ती आली काय? असे प्रश्न प्रहरी यांना विचारून स्वतःच्या अकलेचे कुदर्शन ज्यांना घडवायचे आहे. ते वाहतुकीचे नियम पाळणार काय?
ज्यांना या देशात राहायचं तर आहे. पण या देशावर प्रेम करायचं नाही. ज्यांना इथलं अन्न खायचं तर आहे. पण मिठाला जागायचे नाही. ज्यांना इथले नियम मोडणे म्हणजे शौर्य वाटते. ज्यांच्याकडे केवळ अपराधिक पार्श्वभूमीची प्रमाणपत्रे आहेत. ज्यांना प्रहरींवर हात टाकल्यावर पराक्रम केल्याचा विकृत आनंद होतो. ते वाहतुकीचे नियम पाळणार काय?
लोकांना अशिक्षित अर्धशिक्षित अडाणी ठेवण्यात ज्यांना स्वारस्य आहे. लोकांना लोकशाहीचे कोणतेही प्रशिक्षण द्यावयाचे नाही. लोकांच्या अज्ञानाचा केवळ दुरुपयोगच करायचा आहे. जे काठावरचे ज्ञान घेऊन आहेत अशा बहुसंख्य समाजाचा केवळ बुद्धिभेदच करायचा. काहीही खोटे बोलून स्वतःला काहीही न करता सुद्धा श्रेय कसे मिळेल केवळ हेच सातत्याने पाहत राहायचे. केवळ आणि केवळ व्यक्तिगत लाभाचा विचार करायचा. त्याग समर्पण या केवळ पुस्तकातल्या गोष्टी आहेत अशा भ्रमात राहून तसाच घाणेरडा संदेश आपल्या दूरवर्तनाने समाजात द्यायचा. समाजात चुकीचे आदर्श निर्माण करावयाचे. हेच ज्यांचे ध्येय आहे. ते वाहतुकीचे नियम पाळणार काय?
संसद न्यायपालिका आणि प्रशासन अशी त्रिसूत्री संविधानाची बांधणी आहे. इतकी प्रचंड यंत्रणा निर्माण करून संविधानाने लोकसत्तेच्या मार्गातून शांततामय पद्धतीने आपले सर्व कार्य करण्याचे अथवा करून घेण्याचे अनंत संविधानिक मार्ग उपलब्ध केलेली आहेत. मला आठवते की एका 15 पैशांच्या पोस्ट कार्डला माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचिका म्हणून मान्यता देऊन पाच हजार कोटींचा शेअर घोटाळा चौकशी करावयास लावून उघडकीस आणला होता. सर्वसामान्य माणसाला केवळ एक आवेदन देऊन कोणतीही यंत्रणा जसे संसद, न्यायपालिका अथवा प्रशासन यांना हालचाल करण्यास भाग पाडता येईल असे संविधानात नमूद आहे. परंतु असे आवेदन देण्यावर ज्यांचा विश्वास नाही. त्याचा पाठपुरावा करण्यावर विश्वास नाही. ज्यांना पाठपुरावा न केल्यास काय कार्यवाही करावी याचे थोडे सुद्धा ज्ञान नाही. ज्यांना हे कोणतेही ज्ञान घेण्याची तयारी नाही किंवा त्यापेक्षा असंसदीय मार्ग सोपे वाटतात. ते वाहतुकीचे नियम पाळणार काय?
सन्माननीय भारतीय संविधान आणि त्याअंतर्गत संसद आणि विविध अन्य सभागृह यांनी बनवलेले नियम हे निसर्गाच्या नियमा इतकेच शुद्ध आणि पवित्र आहेत. निसर्गाचे नियम आपण पाळतच असतो. कारण ते पाळावेच लागतात. पाळले नाहीत तर निसर्ग त्वरित शिक्षा करतो. तसेच संविधान सुद्धा त्याच पावित्र्याने पाळले गेले पाहिजे. हे ज्यांना कळत नाही. ते वाहतुकीचे नियम पाळणार काय?
येथे काहींच्या मनात अशी शंका येईल की संविधान आणि निसर्ग नियम एकसारखे कसे काय? सांगतो. म्हणजे लवकरच सांगतो. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
मित्रांनो, लोकसत्ता म्हणजे काय हे जाणून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. ज्यांच्या समाजामध्ये हे लोकशाहीचे ज्ञान नाही त्यांच्या समाजात लोकशाही रुजू शकत नाही. अशिक्षित आणि अर्धशिक्षित जनतेच्या हाती लोकसत्ता देणे म्हणजे प्यालेल्या माकडाच्या हाती जळते कोलीत देण्यासारखे आहे. प्यालेले मर्कट जळते कोलीत घेऊन जे काही करेल तेच अशिक्षित, अर्धशिक्षित किंवा लोकशाहीचे किमान अज्ञान सुद्धा नसलेल्या समाजात होत असते. होत आहे.
अशी लोकशाही जर आम्हाला नको असेल तर मग मला सांगा तुम्हीही हे ज्ञान घेणार नाही काय? वाहतुकीचे नव्हे तर सर्वच नियम पाळणार नाही काय?
चला या तर मग आपण लोकसत्ता पवित्र मानूया, केवळ लोकसत्ताच आपल्याला तारू शकते यावर विश्वास ठेवू या. भारतीय लोकशाही बळकट होणे केवळ भारताच्याच नव्हे तर ज्या संपूर्ण जगाचे मार्गदर्शकत्व भारताकडे येऊ पाहत आहे त्या सर्व जगताचे कल्याण साधण्याकरिता आवश्यक आहे. सारे जग नेहमीच आपल्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहत आहे. चला भारताचे ते मूळ रूप साऱ्या जगास पुन्हा दाखवूया. त्याआधी आपण ते रूप आपल्यामध्ये पाहूया.
Jeet
Advocate Ranjitsinh Ghatge 🦅
9823044282 / 8554972433 / 9049862433
Comments
Post a Comment